साईमत/ नागपूर
नागपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी (IIIT) मध्ये शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याने वसतिगृहाच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी पहाटे घडली. या घटनेमुळे संपूर्ण शैक्षणिक परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रेयश चंद्रकांत माने (मूळ रा. कोल्हापूर) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो IIIT नागपूरमध्ये द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. सोमवारी पहाटे सुमारे 4 वाजता त्याने वसतिगृहाच्या नवव्या मजल्यावरून उडी मारल्याचे समोर आले आहे.
श्रेयश काही दिवसांपासून मानसिक तणावात असल्याची माहिती समोर येत आहे. तो नियमितपणे वर्गात उपस्थित राहत नव्हता तसेच मित्रांशीही कमी बोलत होता, असे सहाध्यायांनी सांगितले. सेमिस्टर परीक्षा तोंडावर असताना अभ्यासाचा ताण असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तो मूळतः कोल्हापूरचा असून कुटुंबाच्या इच्छेनुसार त्याने या संस्थेत प्रवेश घेतला होता. मात्र, शिक्षणाबाबत तो समाधानी नसल्याचेही बोलले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच बुटीबोरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून विद्यार्थ्याचा मोबाईल फोन तपासासाठी जप्त करण्यात आला आहे. मोबाईल अनलॉक झाल्यानंतर आत्महत्येमागील कारणांबाबत अधिक स्पष्टता मिळू शकते, असे पोलिसांनी सांगितले आहे.
दरम्यान, या घटनेनंतर कॅम्पसमधील विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त करत रात्रभर आंदोलन केले. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य आणि तणाव व्यवस्थापनावर प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
श्रेयशच्या निधनाची माहिती मिळताच त्याचे कुटुंबीय नागपूरमध्ये दाखल झाले असून कुटुंबावर शोककळा पसरली आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
