साईमत/ मुरबाड
माळशेज घाट मार्गावरील वैशाखरे वळणाजवळ मंगळवारी सकाळी भीषण अपघात घडला. एसटी बस आणि स्कॉर्पिओ यांच्यात समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून, आणखी चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विठ्ठलवाडी आगाराची एसटी बस सकाळी सुमारे 8.30 वाजता कल्याणहून अहिल्यानगरच्या दिशेने रवाना झाली होती. बस मुरबाड तालुक्यातील टोकावडे–वैशाखरे परिसरात पोहोचताच विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्कॉर्पिओसोबत तिची जोरदार टक्कर झाली.
या धडकेत स्कॉर्पिओमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून मृतदेह पुढील कारवाईसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले.
दरम्यान, या मार्गावर सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे पुन्हा एकदा वाहतूक सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वीच याच परिसरात पांजरा पुलाजवळ झालेल्या भीषण अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे माळशेज घाट व आसपासच्या धोकादायक वळणांवरील सुरक्षिततेबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
