साईमत/ नांदेड
शहरात महानगरपालिकेकडून सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेला हिंसक वळण लागल्याची घटना समोर आली आहे. खडकापुर ते वाघी रोड परिसरात अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या महापालिका पथकावर तसेच पोलिसांवर काही नागरिकांकडून विरोध करत हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी लाठीमार करून जमाव पांगवला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महानगरपालिकेचे पथक खडकापुर–वाघी रोड परिसरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमण हटवण्यासाठी सोमवारी गेले होते. या कारवाईदरम्यान काही व्यक्तींनी महापालिकेच्या कामात अडथळा निर्माण केला. तसेच संतप्त जमावातील काही तरुणांनी थेट जेसीबीवर चढून चालकाला मारहाण केल्याची घटना घडली होती. त्यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून जेसीबी चालकाची सुटका केली होती.
या घटनेनंतर आज पुन्हा पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटावाची कारवाई सुरू करण्यात आली. मात्र यावेळी अतिक्रमणधारक आणि पोलिसांमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला. कारवाईला विरोध करत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी जमवली. परिस्थिती चिघळत असल्याने आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने पोलिसांनी लाठीमार करून जमाव पांगवला.
सध्या खडकापुर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिस्थिती नियंत्रणात असली तरी तणाव कायम आहे. दरम्यान, सरकारी कामात अडथळा आणणाऱ्यांवर तसेच जेसीबी चालकाला मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
