रुद्देवाडी बसस्टॉपजवळ दुर्घटना; जखमींची प्रकृती चिंताजनक, बचावकार्य सुरू
साईमत / गाणगापूर
गाणगापूर ते अक्कलकोट मार्गावर सोमवारी सकाळी भीषण अपघात घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. गाणगापूरहून अक्कलकोटकडे येणाऱ्या प्रवासी बसला समोरून येणाऱ्या टिप्परने जोरदार धडक दिली. रुद्देवाडी बसस्टॉपजवळ झालेल्या या अपघातात धडकेचा जोर इतका तीव्र होता की बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले.
या दुर्घटनेत सुमारे २५ ते ३० प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला होता. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेत बचावकार्य सुरू केले. त्यानंतर पोलिस आणि आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल होऊन जखमींना बाहेर काढण्याचे काम हाती घेतले.
या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, पोलिसांकडून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू असून, पुढील तपास करण्यात येत आहे.
