चार सिलिंडर स्फोटांनी परिसर हादरला, अग्निशमन दलाची मोठी धावपळ
साईमत/ जळगाव / प्रतिनिधी
शहरातील एमआयडीसी परिसरात आज सकाळी घडलेल्या भीषण आगीच्या घटनेने औद्योगिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. ‘जे’ सेक्टरमधील एका चटई उत्पादन करणाऱ्या कंपनीला अचानक आग लागली असून काही क्षणांतच आगीने प्रचंड रौद्ररूप धारण केले. आगीच्या उंच ज्वाळा आणि काळ्या धुराचे लोट दूरवरूनही स्पष्ट दिसत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीतील ज्वालाग्राही साहित्यामुळे आग अतिशय वेगाने पसरली. परिस्थिती आणखी गंभीर झाली तेव्हा कंपनीत ठेवलेल्या गॅस सिलिंडरचे एकापाठोपाठ एक तब्बल चार मोठे स्फोट झाले. या स्फोटांच्या जोरदार आवाजाने संपूर्ण एमआयडीसी परिसर हादरून गेला असून नागरिक आणि कामगारांमध्ये मोठी घबराट पसरली.
आगीचे स्वरूप इतके तीव्र होते की काही वेळातच ती शेजारील ठिबक सिंचन साहित्य तयार करणाऱ्या कंपनीपर्यंत पोहोचली. त्यामुळे परिसरातील इतर औद्योगिक युनिट्सनाही धोका निर्माण झाला आहे. आगीमुळे सर्वत्र धुराचे दाट लोट पसरले असून श्वास घेण्यासही अडथळा निर्माण होत आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे दोन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र आगीचा विस्तार मोठा असल्याने सुरुवातीचे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे चित्र आहे. बंबांतील पाणी संपल्यानंतर आगीने पुन्हा उचल खाल्ल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली. त्यामुळे अतिरिक्त मदतीसाठी महापालिकेसह इतर ठिकाणांहून बंब मागवण्यात आले आहेत.
सुदैवाने आज शनिवार असल्याने कंपनीला सुट्टी होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कामगार उपस्थित नसल्याने कोणतीही जीवितहानी टळली आहे. मात्र या आगीत संबंधित कंपनीचे आणि शेजारील उद्योगांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असला तरी अधिकृत कारण तपासानंतरच समोर येणार आहे.सध्या अग्निशमन दल आणि प्रशासनाकडून आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
