साईमत / जयपूर
राजस्थानातील भिवानी परिसरातील साथलका गावातील बिल्लू कॉलनीमध्ये आज सकाळी गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन एकाच कुटुंबातील सात जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घरात सकाळी जेवण बनवण्याची तयारी सुरू असताना गॅस सिलेंडरमधून गळती होत होती. दरम्यान, गॅस पेटवण्यासाठी माचिस लावताच अचानक मोठा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी होती की घराचे मोठे नुकसान झाले.
या दुर्घटनेत रामसिंग, ममता, भुवेश, पंकज, छगन, काजल आणि किशनवती हे सात जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
प्राथमिक उपचारानंतर सर्व जखमींना अधिक उपचारासाठी अलवर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, गॅस गळतीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे हा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
