साईमत / पुणे
मावळ तालुक्यातील पवनानगर परिसरात एका तरुणाचा निर्घृण खून करून त्याचा मृतदेह दुचाकीसह जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाचा छडा लावत पुणे ग्रामीण पोलीस यांनी अवघ्या तीन ते चार तासांत दोन आरोपींना अटक केली आहे.
अमोल अनंता मोहोळ (वय ३३, रा. वारू) असे मृत तरुणाचे नाव असून भरत काशिनाथ वाल्हेकर आणि सुनील भिमा पवार (दोघेही रा. पवनानगर, ता. मावळ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, पोलीस निरीक्षक दिनेश तायडे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके तयार करण्यात आली.
तपासादरम्यान घटनास्थळाचा पंचनामा, संशयितांचे मोबाईल कॉल रेकॉर्ड्स आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला. पोलिसांनी अत्यंत जलद आणि कौशल्यपूर्ण तपास करत काही तासांतच दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
प्राथमिक तपासात हा खून वैयक्तिक वादातून झाल्याचे समोर आले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. अल्पावधीत गुन्हा उघडकीस आणून आरोपींना जेरबंद केल्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
