नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार; आरोपीविरुद्ध इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
साईमत / नाशिक
सोशल मीडियावरील ओळखीचा गैरफायदा घेत एका तरुणीला गुंगीकारक पेय देऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात सिद्धार्थ पवार (वय ३३, रा. इंदिरानगर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित पीडित तरुणी ही मुंबईतील बोरिवली येथे एका फार्मा कंपनीत नोकरी करते. एप्रिल २०२६ दरम्यान ‘युनिगॅदर’ या इन्स्टाग्राम पेजवरील कार्यक्रमासाठी ती नाशिक येथे आली होती. ५ एप्रिल रोजी गंगापूर रोड परिसरातील एका कॅफेमध्ये झालेल्या कार्यक्रमादरम्यान तिची आरोपीशी ओळख झाली. आरोपीने स्वतःला अविवाहित असल्याचे सांगत विश्वास संपादन केला.
यानंतर दोघांमध्ये मोबाईल क्रमांकांची देवाणघेवाण झाली आणि ‘स्ट्रेन्जर्स थिंग्स’ नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आला. आरोपीने वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने तरुणीला पुन्हा नाशिकला बोलावले.
१८ एप्रिल रोजी तरुणी म्हसरूळ येथील बहिणीकडे असताना आरोपी तिला घेऊन गेला. त्याच्यासोबत त्याचे काही मित्रही होते. गंगापूर रोड परिसरात भेटीनंतर आरोपीने कारमध्ये दिलेल्या ज्यूसमधून तिला गुंगीकारक पदार्थ दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर गुंगीच्या अवस्थेत तिला कारमध्ये फिरवत इंदिरानगर येथील निवासस्थानी नेऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
शुद्धीवर आल्यानंतर पीडितेने याबाबत जाब विचारला असता आरोपीने तिला जिवे मारण्याची तसेच बदनामी करण्याची धमकी दिली. पहाटे तिला पुन्हा बहिणीच्या घरी सोडण्यात आले.
घटनेनंतर दुसऱ्या दिवशीही आरोपीने तिला जबरदस्तीने मुंबईला नेण्याचा प्रयत्न केला. बोरिवली परिसरात एका हॉटेलमध्ये नेण्याचाही प्रयत्न करण्यात आला. या सर्व प्रकारानंतर पीडितेने आरोपीच्या मित्रांशी संपर्क साधला, मात्र त्यातून कोणतीही मदत मिळाली नाही.
अखेर २३ एप्रिल रोजी तिने अशोक स्तंभ परिसरातील महिला संस्थेकडे धाव घेतली. संस्थेच्या मार्गदर्शनानुसार तिने पोलिसांत तक्रार दिली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
