जमशेदपूर स्थानक परिसरातील घटना; व्यावसायिक वादातून हत्येची शक्यता
साईमत / जमशेदपूर
शहरातील टाटानगर रेल्वे स्थानक परिसरात रविवारी रात्री उशिरा घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी रेल्वेच्या लोको पायलटवर जवळून गोळी झाडून त्यांची निर्घृण हत्या केली. जी. के. मीना असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मीना हे रात्री उशिरा लोको पायलट लॉबीकडे जात असताना दोन हल्लेखोरांनी त्यांना लक्ष्य केले. दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी जवळून गोळी झाडली, जी थेट त्यांच्या कपाळात लागली. गंभीर जखमी अवस्थेत ते जागीच कोसळले. हल्लेखोरांनी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.
घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि रेल्वे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जखमी मीना यांना तातडीने रेल्वे रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.
प्राथमिक तपासात मीना हे रेल्वेतील कामासोबतच जमीन व्यवहार आणि कंत्राटी कामांमध्येही सहभागी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे व्यावसायिक वादातून हा हल्ला झाल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू असून हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. या घटनेमुळे स्थानकाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून कडक सुरक्षा उपाययोजनांची मागणी होत आहे.
