हवेतील आर्द्रता घटल्याने उकाडा वाढला; २८ एप्रिलपर्यंत तापमान ४४ अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज
साईमत / जळगाव
जळगाव शहरासह जिल्ह्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून शनिवारी तापमान ४३.३ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. हवेतील आर्द्रता मोठ्या प्रमाणात घटल्याने आणि उत्तर भारतात सक्रिय असलेल्या उच्च दाबाच्या पट्ट्यामुळे जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत आहे. परिणामी, जळगावकर अक्षरशः होरपळून निघत आहेत.
हवामान अभ्यासकांच्या अंदाजानुसार, येत्या २८ एप्रिलपर्यंत ही उष्णतेची तीव्रता कायम राहणार असून पारा ४४ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस जळगावकरांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.
सकाळी ९ वाजल्यापासूनच उन्हाचे तीव्र चटके जाणवू लागल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. दुपारच्या सुमारास उकाड्याची तीव्रता प्रचंड वाढत असल्याने बाजारपेठा व रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. रात्रीच्या वेळीही तापमानात वाढ झाल्याने उकाडा कायम राहून नागरिकांची झोप बिघडत आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, २६ एप्रिल रोजी कमाल तापमान ४३ ते ४४ अंश, २७ एप्रिल रोजी ४२ ते ४४ अंश, २८ एप्रिल रोजी ४२ ते ४३ अंश राहण्याची शक्यता आहे.
वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका वाढला असून नागरिकांनी दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे तसेच सुती कपड्यांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
