दोन ते तीन जणांकडून चालकाला मारहाण धारदार शस्त्राने वार
साईमत जळगाव प्रतिनिधी
शहरातील एमआयडीसी परिसरात शनिवारी दुपारी भरदिवसा घडलेल्या धक्कादायक घटनेत ट्रक चालकावर धारदार शस्त्राने वार करून त्याला लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात शंकर कारभारी मगर (वय ४२, रा. अहिल्यानगर) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शंकर मगर हे ट्रक चालक असून ते आपल्या वाहनासह एमआयडीसी परिसरात आले होते. शनिवारी दुपारी सुमारे दीड ते दोन वाजेच्या दरम्यान त्यांच्याजवळ दोन ते तीन अनोळखी इसम आले. त्यांनी प्रथम चालकाला मारहाण करून दहशत निर्माण केली आणि नंतर धारदार शस्त्राने त्यांच्या गळ्यावर वार केला.
हल्ल्यानंतर आरोपींनी चालकाच्या खिशातील सुमारे १३ हजार रुपये रोख रक्कम जबरीने हिसकावून घटनास्थळावरून पलायन केले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात गोंधळ उडाला. काही प्रत्यक्षदर्शींनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी चालकाला रिक्षाच्या मदतीने रुग्णालयात हलविले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून, नेमकी घटना कुठे घडली आणि आरोपी कोण याबाबतचा शोध घेतला जात आहे. जखमी चालकाचा जबाब नोंदवल्यानंतर या प्रकरणाचा अधिक उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, जखमी चालकाच्या कुटुंबीयांना रिक्षा चालकाने मोबाईलवरून संपर्क साधून दुपारी साडेतीनच्या सुमारास घटनेची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय हादरले असून रविवारी सकाळपर्यंत ते जळगावात पोहोचणार असल्याचे समजते. शहरात भरदिवसा घडलेल्या या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, तसेच चालकाच्या प्रकृतीबाबत कुटुंबीय चिंतेत आहेत.
