तरसोद फाट्याजवळ दुचाकीस्वार घसरून पडले; सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या नेतृत्वाखाली तातडीची कारवाई
साईमत नशिराबाद प्रतिनिधी
कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच प्रसंगी जनतेच्या जीविताचे रक्षण करण्याची जबाबदारीही पोलिसच पार पाडतात, याचे जिवंत उदाहरण जळगाव बायपासवरील तरसोद फाट्याजवळ मध्यरात्री घडलेल्या घटनेतून पुन्हा एकदा दिसून आले. रस्त्यावर सांडलेल्या ऑईलमुळे संभाव्य मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र नशिराबाद पोलिसांच्या तत्परतेमुळे ही गंभीर दुर्घटना टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री सुमारे ११.४५ वाजता तरसोद फाट्याजवळ एक जेसीबी यंत्र अचानक बिघाडामुळे बंद पडले. याच दरम्यान त्यातून मोठ्या प्रमाणात ऑईल गळती होऊन ते थेट जळगाव बायपास रस्त्यावर पसरले. हा मार्ग अत्यंत वर्दळीचा असून वाहनांचा वेगही जास्त असतो. अंधाराची भर पडल्याने रस्त्यावर सांडलेल्या ऑईलचा अंदाज न आल्यामुळे दोन ते तीन दुचाकीस्वार घसरून पडल्याची घटना घडली.
घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस ठाण्याच्या प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांनी तातडीने आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी कोणत्याही यंत्रणेची प्रतीक्षा न करता स्वतः पुढाकार घेत रस्त्यावर सांडलेल्या ऑईलवर माती टाकण्याचे काम सुरू केले.
पोलिसांनी केवळ तातडीने उपाययोजना केली नाही तर नादुरुस्त जेसीबी सुरक्षितरीत्या रस्त्याच्या कडेला हलवून वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये याचीही काळजी घेतली. त्यानंतर संपूर्ण वेळ घटनास्थळी थांबून वाहतूक नियंत्रणाचे कामही त्यांनी प्रभावीपणे सांभाळले.
रात्री सुमारे ११.३० वाजता सुरू झालेले हे मदतकार्य पहाटे २ वाजेपर्यंत अखंडपणे सुरू होते. रस्ता पूर्णपणे सुरक्षित झाल्याची खात्री झाल्यानंतरच पोलिसांनी घटनास्थळ सोडले.
पोलिसांच्या या वेळेवर केलेल्या हस्तक्षेपामुळे मोठा अपघात टळला असून स्थानिक नागरिकांकडून नशिराबाद पोलिसांचे विशेषतः सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या तत्परतेचे आणि प्रसंगावधानाचे मनापासून कौतुक होत आहे.
