मुली व महिलांना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन
साईमत जळगाव प्रतिनिधी
मुली व महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत मिळावी या उद्देशाने नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने, महिला व बाल विकास विभाग जळगाव यांच्या सहकार्याने विशेष जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमाद्वारे विद्यार्थिनींना व महिलांना विविध महत्त्वाच्या हेल्पलाईन क्रमांकांची सविस्तर माहिती देण्यात आली. कार्यक्रमात महिला व बालविकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली आपत्कालीन परिस्थितीत कोणत्या क्रमांकावर संपर्क साधावा, याबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी महिला हेल्पलाईन १०९१, चाइल्डलाइन १०९८ आणि पोलीस आपत्कालीन सेवा १०० या महत्त्वाच्या क्रमांकांची सविस्तर माहिती देत त्यांच्या वापराबाबत प्रात्यक्षिक स्वरूपात समजावून सांगण्यात आले. कोणत्याही अडचणीच्या किंवा धोकादायक परिस्थितीत न घाबरता त्वरित मदत मागणे किती आवश्यक आहे, यावरही भर देण्यात आला.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थिनींमध्ये व महिलांमध्ये आत्मविश्वास वाढविणे, संकटसमयी योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणे तसेच त्यांच्या सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करणे हा असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना महिलांनी कोणत्याही परिस्थितीत घाबरून न जाता तत्काळ मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले.या उपक्रमासाठी महिला व बालविकास अधिकारी ऋषिकेश काळे, मुला-मुलींचे बालगृह अधीक्षक रविकिरण अहिरराव, प्रवीण पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.या प्रसंगी नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सौ. मनीषा पाटील, आशा मौर्य, रेणुका हिंगू, वंदना मंडावरे, राधिका पाटील, विश्वनाथ फेगडे, राजेंद्र सूर्यवंशी, शरयू पाटील, अथर्व पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.महिलांच्या सुरक्षिततेसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून विशेष कौतुक करण्यात आले.
