स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत पाळधी येथे महिलांना स्वच्छतेचे प्रशिक्षण
साईमत पाळधी, ता. धरणगाव प्रतिनिधी:
‘माझं गाव-स्वच्छ गाव’ हा संकल्प प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असून, या चळवळीला महिला बचत गटांनी पुढाकार देणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. महिला बचत गट म्हणजे परिवर्तनाची शक्ती असून, गावांच्या सर्वांगीण विकासात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
धरणगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात ‘स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२’ अंतर्गत ‘कचऱ्याचे विलगीकरण, सार्वजनिक स्वच्छता व वर्तन बदल’ या विषयावरील महिला बचत गट प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. यावेळी उपस्थित महिलांनी त्यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार केला.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात पालकमंत्री पाटील म्हणाले की, महिला ही खऱ्या अर्थाने लक्ष्मी आहे आणि जिथे स्वच्छता असते, तिथे समृद्धीही नांदते. शासनाचा महिला बचत गटांवर पूर्ण विश्वास असून, या प्रशिक्षणातून मिळालेले ज्ञान प्रत्येक गावात पोहोचवून स्वच्छतेची खरी क्रांती घडविण्याची जबाबदारी महिलांनी पार पाडावी. ग्रामीण भागात स्वच्छतेबाबत जनजागृती अधिक प्रभावी करण्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला, तर गावांचा चेहरामोहरा बदलू शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रेमराज पाटील, उपसभापती सुदाम पाटील, माजी तालुकाप्रमुख गजानन नाना पाटील, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल जाधव, गटविकास अधिकारी किशोर वानखेडे यांच्यासह विविध गावांतील महिला बचत गटांच्या प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक भैया मराठे यांनी केले, तर प्रास्ताविक राज्य समन्वयक दिगंबर झरेकर यांनी मांडले. शेवटी आभार प्रदर्शन कार्यकारी अभियंता राहुल जाधव यांनी केले.
