महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकारातून प्रमुख चौकांमध्ये पाण्याची फवारणी; उष्णतेत तात्पुरता थंडावा
साईमत जळगाव प्रतिनिधी
शहरात वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असताना जळगाव महानगरपालिकेने उष्णतेपासून दिलासा देण्यासाठी ‘वॉटर शॉवर’चा अनोखा उपक्रम राबविला. तापमानाचा पारा ४२ अंशांच्या पुढे गेल्याने शनिवारी दुपारी शहरातील प्रमुख चौक आणि मुख्य रस्त्यांवर टँकरच्या सहाय्याने पाण्याची फवारणी करण्यात आली. या उपक्रमामुळे कडक उन्हात होरपळणाऱ्या जळगावकरांना काही प्रमाणात का होईना, दिलासा मिळाला.
महापौर दीपमाला काळे यांच्या निर्देशानुसार ही मोहीम राबविण्यात आली. उन्हाच्या तीव्र लाटेमुळे दुपारच्या वेळेत रस्ते अक्षरशः तापून निघत असून नागरिकांसह वाहनधारकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील उष्णतेची तीव्रता कमी करण्यासाठी महापालिकेने दोन टँकरच्या सहाय्याने पाणी फवारणी केली. विशेष म्हणजे हे टँकर महापौरांनी स्वतःच्या वतीने उपलब्ध करून दिल्याची माहिती देण्यात आली.
चित्रा चौक, कोर्ट चौक, नवीन बसस्थानक परिसर, आकाशवाणी चौक, काव्यरत्नावली चौक, नेहरू चौक आणि टॉवर चौक अशा शहरातील वर्दळीच्या भागांमध्ये ही फवारणी करण्यात आली. या उपक्रमामुळे परिसरातील तापमानात किंचित घट जाणवली असून रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना तात्पुरता थंडावा मिळाला. अनेक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत महापालिकेच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
या मोहिमेदरम्यान शहर अभियंता योगेश बोरोले, पर्यावरण विभागाचे अधिकारी प्रकाश पाटील यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष रस्त्यावर उपस्थित राहून कामकाजावर लक्ष ठेवत होते. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत ही मोहीम राबविण्यात आली.
दरम्यान, तापमानात आणखी वाढ झाल्यास अशा प्रकारच्या उपक्रमांचा विस्तार करण्याचा महापालिका प्रशासनाचा विचार असल्याचे समजते. उष्णतेच्या लाटेचा सामना करताना पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, सावलीची व्यवस्था आणि सार्वजनिक ठिकाणी थंडावा निर्माण करणाऱ्या उपाययोजनांवर प्रशासनाचा पुढील काळात अधिक भर राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
