गुणवत्तेला तडजोड नाही; प्रत्येक मतदारसंघात समित्या स्थापन करून कामे गतीने पूर्ण करण्याचा आदेश
साईमत जळगाव प्रतिनिधी
राज्य शासनाची मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजना ही शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरणारी असून या योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी व्हावी, असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. जिल्हास्तरीय समितीची बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.
पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले की, ही योजना केवळ कागदावर मर्यादित नसून बळीराजाच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडवणारी आहे. त्यामुळे कामाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. रस्त्यांची गुणवत्ता टिकवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी, तसेच प्रत्येक विधानसभा मतदारसंघात समित्या स्थापन करून स्थानिक आमदारांना विश्वासात घेऊन कामे पूर्ण करावीत, असेही त्यांनी सांगितले.
“ही योजना चारचाकी वाहनांसाठी नसून शेतात जाणाऱ्या बैलांच्या पावलांचा विचार करणारी आहे. त्यामुळेच ती शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने दिलासा देणारी ठरणार आहे,” असे सांगत त्यांनी योजनेचे महत्त्व अधोरेखित केले.
योजनेच्या अंमलबजावणीत ५० टक्के वाटा ग्राम सडक योजनेचा तर ५० टक्के जिल्हा परिषदेचा राहणार आहे. पहिल्या टप्प्यात १४ डिसेंबर २०२५ च्या शासन निर्णयानुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघात २५ किलोमीटरचा क्लस्टर तयार करून कामांना सुरुवात करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सांगितले की, उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांनी आठवड्यातून किमान एक बैठक घेऊन कामांना गती द्यावी. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी स्थानिक आमदारांशी समन्वय साधून त्यांच्या सूचनांनुसार कामे राबवावीत.
बैठकीत उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीमती घाटगे यांनी योजनेबाबत सविस्तर सादरीकरण केले. तसेच जिल्ह्याच्या प्रति तास दर (एल-१) प्रस्तावास जिल्हास्तरीय समितीने मान्यता दिली.
