कर्णकर्कश आवाजावर कारवाई; जळगावात सायलेन्सरचा चक्काचूर
साईमत जळगाव प्रतिनिधी
शहरातील वाढत्या बेशिस्त वाहनचालकांवर आणि वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करणाऱ्यांवर जळगाव शहर वाहतूक शाखेने सन २०२६ मध्ये मोठी आणि ठोस कारवाई करत रस्ता सुरक्षा अभियान अधिक तीव्र केले आहे. या विशेष मोहिमेत तब्बल १०० कर्कश आवाज करणारे सायलेन्सर जप्त करून ते रोडरोलरच्या सहाय्याने निकामी करण्यात आले, तर २५० फॅन्सी नंबर प्लेट्सही जप्त करून नष्ट करण्यात आल्या.
वाहतूक शाखेच्या पथकांनी शहरात तपासणीदरम्यान असे निदर्शनास आणले की, अनेक दुचाकींवर कंपनीकडून बसविण्यात आलेल्या सायलेन्सरऐवजी बाहेरून बदल करून कर्कश आवाज करणारे सायलेन्सर बसवण्यात आले आहेत. या सायलेन्सरमुळे स्थानिक नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत होता. ध्वनी प्रदूषण वाढून आरोग्यावर परिणाम होण्याचा धोका निर्माण झाल्याने ही कारवाई करण्यात आली.
तसेच शहरात अवैधरित्या वापरल्या जाणाऱ्या फॅन्सी नंबर प्लेट्सवरही मोठी कारवाई करत २५० नंबर प्लेट्स जप्त करण्यात आल्या. पोलिस अधीक्षक मा. श्रीकांत धिवरे यांच्या आदेशान्वये या सर्व जप्त केलेल्या सायलेन्सर व नंबर प्लेट्स रोडरोलरच्या सहाय्याने पूर्णपणे नष्ट करण्यात आल्या.
जळगाव जिल्ह्यातील वाढत्या रस्ता अपघातांच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम अधिक महत्वाची ठरते. सन २०२५ मध्ये जिल्ह्यात एकूण ९३९ अपघात घडले असून त्यापैकी ४५० प्राणांतिक अपघातांमध्ये सुमारे ४८७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक विभागाने कठोर पावले उचलली आहेत.
या अंतर्गत विना हेल्मेट वाहनचालक, ट्रिपल सीट प्रवास, अल्पवयीन चालक, रॅश ड्रायव्हिंग, नो पार्किंग, अवैध प्रवासी वाहतूक, दारू पिऊन वाहन चालवणे, राँग साईड ड्रायव्हिंग, वाहन चालवताना मोबाईलचा वापर तसेच कर्कश सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनचालकांवर विशेष पथकांद्वारे सातत्याने कारवाई केली जाणार आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळी पथके तयार करण्यात आली असून ही मोहीम यापुढे अधिक तीव्र आणि नियमित स्वरूपात सुरू राहणार असल्याचे वाहतूक शाखेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून संभाव्य कारवाईपासून स्वतःला वाचवावे, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.
दरम्यान, जळगाव जिल्हा ‘शून्य प्राणहानी’ उद्दिष्टाच्या दिशेने वाटचाल करत असून रस्ता सुरक्षा समितीच्या माध्यमातून जनजागृती आणि कठोर अंमलबजावणी दोन्ही पातळ्यांवर काम सुरू आहे, अशी माहितीही देण्यात आली.
