साईमत / जळगाव
जळगाव जिल्ह्यातील वाढत्या तापमानाचा कहर आता जीवघेणा ठरत असून, रावेर शहरात उष्माघातामुळे एका कष्टकरी कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
योगेश सुधाकर महाजन (रा. रावेर) असे मृत कामगाराचे नाव असून ते अत्यंत मेहनती आणि कुटुंबासाठी झटणारे व्यक्ती म्हणून ओळखले जात होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी ते बांधकाम क्षेत्रात मोलमजुरी करत होते. वाढत्या खर्चामुळे ते अतिरिक्त उत्पन्नासाठी फावल्या वेळेत दुध डेअरीतही काम करत असत.
दिवसभर कडाक्याच्या उन्हात काम केल्यानंतर त्यांना तीव्र उष्णतेचा त्रास जाणवू लागला. रात्री त्यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाला. उष्णतेच्या झळांमुळे तब्येत अधिकच खालावली आणि रात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
त्यांच्या पश्चात पत्नी व दोन लहान मुले असा परिवार आहे. घरातील एकमेव कमावता व्यक्ती गमावल्याने कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.
दरम्यान, जिल्ह्यात तापमान ४२ अंशांच्या पुढे गेले असून दुपारच्या वेळी तीव्र उष्ण वारे (लू) वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
