अमेरिकेची मोठी लष्करी कारवाई; ३१ इराणी जहाजांचा मार्ग रोखल्याने पश्चिम आशियात तणाव शिगेला
साईमत / ववृत्तसंथा
पश्चिम आशियात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, अमेरिकेने इराणविरोधात मोठे पाऊल उचलले आहे. होर्मुझ सामुद्रधुनीत इराणच्या समुद्री हालचालींवर निर्बंध आणत अमेरिकेकडून नाकेबंदीची कारवाई सुरू करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे ३१ इराणी जहाजांचा मार्ग रोखण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
CENTCOM च्या माहितीनुसार, १३ एप्रिलपासून ही कारवाई सुरू असून सामुद्रधुनीतून संशयित जहाजांना प्रवेश रोखला जात आहे. रोखण्यात आलेल्या जहाजांमध्ये तेलवाहू टँकरचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. काही जहाजांनी अमेरिकेच्या नियमांचे पालन केल्याचीही माहिती आहे.
या कारवाईसाठी अमेरिकेने मोठ्या प्रमाणात लष्करी तैनाती केली असून सुमारे १० हजार सैनिक, १०० पेक्षा अधिक लढाऊ विमाने, विमानवाहू नौका, ड्रोन, इंधनवाहू विमाने आणि १७ हून अधिक युद्धनौका या परिसरात तैनात करण्यात आल्या आहेत.
जगातील अत्यंत महत्त्वाचा व्यापारी मार्ग मानल्या जाणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीत या कारवाईचा मोठा परिणाम दिसून येत आहे. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात तेल आणि इतर वस्तूंची वाहतूक होते. नाकेबंदीमुळे जागतिक व्यापारावर परिणाम होत असून शेअर बाजारातही अस्थिरता निर्माण झाल्याचे दिसत आहे.
तज्ज्ञांच्या मते, ही कारवाई इराणवर आर्थिक दबाव टाकण्याच्या रणनीतीचा भाग असू शकते. दोन्ही देशांमधील तणाव कायम असून, पुढील काळात परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, या संघर्षावर तोडगा निघणार का आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक पुन्हा सुरळीत होणार का, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
