कार्ड सेवा विस्कळीत, रांगा लांबच लांब पिण्याच्या पाण्याअभावी प्रवासी त्रस्त
साईमत जळगाव प्रतिनिधी
शहरातील मध्यवर्ती बस स्थानकावर बसविण्यात आलेली एनसीएमसी (National Common Mobility Card) मशीन वारंवार बंद पडत असल्याने प्रवाशांची, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. डिजिटल सुविधांचा लाभ घेण्यासाठी बसस्थानकावर येणाऱ्या नागरिकांना मात्र प्रत्यक्षात त्रासदायक अनुभवाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे.
कार्ड काढणे, रिचार्ज करणे किंवा इतर सेवा घेण्यासाठी दररोज मोठ्या संख्येने प्रवासी बस स्थानकावर येत असतात. मात्र मशीन वारंवार बंद पडत असल्याने संपूर्ण कामकाज ठप्प होते. परिणामी, नागरिकांना लांबच लांब रांगेत उभे राहावे लागते. उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेत तासन्तास उभे राहिल्याने ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याची तक्रार वाढत आहे.
स्थानक परिसरातील आणखी एक गंभीर समस्या म्हणजे पिण्याच्या पाण्याची अपुरी व्यवस्था. प्रवाशांना आवश्यक पाणी उपलब्ध न झाल्याने त्यांची अवस्था अधिकच बिकट होत आहे. उन्हाच्या तडाख्यात तहान भागविण्यासाठी प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
त्याचबरोबर बसण्याची पुरेशी व्यवस्था आणि सावलीची सोय नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय अधिकच वाढली आहे. स्थानकावर मूलभूत सुविधा अपुऱ्या असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांनी या समस्यांबाबत वारंवार संबंधित प्रशासनाकडे तक्रारी केल्या असल्या तरी अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना वाढत असून, प्रशासनाने तातडीने लक्ष घालून एनसीएमसी मशीनची दुरुस्ती, अतिरिक्त मशीनची व्यवस्था तसेच पिण्याच्या पाण्याची व सावलीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
एकूणच, डिजिटल सुविधा असूनही त्यांचा लाभ घेता न आल्याने जळगाव बस स्थानकावरील प्रवाशांची परवड थांबणार तरी कधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
