कौटुंबिक वादातून टोकाचे पाऊल; मंचरमध्ये खळबळजनक घटना
साईमत / पुणे
जिल्ह्यातील मंचर (ता. आंबेगाव) येथे एका महिलेने अत्यंत धक्कादायक कृत्य केल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वादातून संतप्त झालेल्या आईने स्वतःच्या १४ वर्षीय मुलीचा गळा दाबून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. मुलगी मृत झाल्याचा समज करून घेतल्यानंतर तिने सहा वर्षांच्या मुलाला सोबत घेऊन विहिरीत उडी मारत आत्महत्येचाही प्रयत्न केला.
ही घटना शुक्रवारी (दि. ३ एप्रिल) सकाळी सुमारे सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास तपनेश्वर स्मशानभूमीजवळ घडली. नेहाल आशिष बाणखेले (वय ६) असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव असून, परिज्ञा बाणखेले (वय १४) व हर्षदा बाणखेले या दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हर्षदा बाणखेले या महिला काही वर्षांपासून स्वतंत्र राहत होत्या. कौटुंबिक वादातून मानसिक तणाव वाढल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सकाळच्या सुमारास त्यांनी मुलीचा गळा दाबून तिला बेशुद्ध केले. त्यानंतर ती मृत झाल्याचा समज करून घेत त्यांनी सहा वर्षांच्या मुलासह जवळील विहिरीत उडी घेतली.
दरम्यान, विहिरीतून मोठा आवाज आल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. काही धाडसी नागरिकांनी तत्काळ विहिरीत उतरून महिला व मुलाला बाहेर काढले. मात्र, या दुर्घटनेत सहा वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर महिला व मुलगी गंभीर जखमी अवस्थेत आढळून आल्या.
या घटनेमुळे मंचर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
