साईमत / दिल्ली
देशाची राजधानी दिल्लीमध्ये केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)ने मोठी कारवाई करत दोन वेगवेगळ्या लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये चार सरकारी अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक केली आहे. या कारवाईमुळे महानगरपालिका आणि पुरातत्व विभागातील कथित भ्रष्टाचार उघडकीस आला असून शहरात खळबळ उडाली आहे.
पहिल्या प्रकरणात, ३१ मार्च रोजी दिल्ली महानगरपालिकेच्या शाहदरा उत्तर विभागातील एका अधिकाऱ्याविरोधात तक्रार दाखल झाली होती. तक्रारदाराचे नुकतेच नूतनीकरण केलेले घर पाडू नये यासाठी संबंधित अधिकाऱ्याने ८०,००० रुपयांची लाच मागितल्याचा आरोप होता. या तक्रारीची दखल घेत सीबीआयने १ एप्रिल रोजी सापळा रचत संबंधित अधिकारी आणि त्याच्या शिपायाला लाच घेताना रंगेहाथ पकडले.
दुसऱ्या प्रकरणात, ३० मार्च रोजी जंतर मंतर उप-मंडळात कार्यरत भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय)च्या दोन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. एका स्मारक परिचराने संवर्धन सहाय्यक असल्याचे भासवून २४ मार्च रोजी दिलेली नोटीस रद्द करण्यासाठी आणि काही कामांना परवानगी देण्यासाठी ३.५ लाख रुपयांची लाच मागितली होती. नंतर हा व्यवहार ३.१० लाख रुपयांवर ठरला. सीबीआयने या दोन्ही अधिकाऱ्यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली.
चारही अधिकाऱ्यांना सुरुवातीला ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील भ्रष्टाचाराचे जाळे किती मोठे आहे आणि यामध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे का, याचा तपास सीबीआयकडून सुरू आहे. या कारवाईमुळे दिल्लीतील सरकारी यंत्रणांमध्ये मोठी खळबळ माजली आहे.
