साईमत / मुंबई
देशभरात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढत असताना मुंबईतही अशाच एका धक्कादायक घटनेचा पर्दाफाश झाला आहे. ताडदेव परिसरात एका न्यायमूर्तीची तब्बल ९३ हजार रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी ताडदेव पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ४६ वर्षीय तक्रारदार हे ताडदेव येथे वास्तव्यास असून लघुवाद न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मोबाईलच्या स्क्रीनमध्ये बिघाड झाल्याने त्यांनी गुगलवर कस्टमर केअरचा संपर्क क्रमांक शोधला. त्यानंतर एका व्यक्तीने स्वतःला मोबाईल कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे सांगत त्यांचा विश्वास जिंकला.
सदर व्यक्तीने तक्रार नोंदवण्याच्या बहाण्याने कस्टमर सपोर्ट अॅप डाउनलोड करण्यास सांगत एपीके फाईल पाठवली. न्यायमूर्तींनी ती फाईल डाउनलोड करून अॅप इंस्टॉल केले. पुढे प्रक्रिया सुरू असल्याचे सांगत १० रुपये भरण्यास सांगण्यात आले. व्यवहार करताना त्यांनी दोनदा १० रुपये भरले, मात्र काही वेळातच त्यांच्या गुगल पे खात्यातून ९३ हजार रुपये वजा झाल्याचे उघड झाले.
ही रक्कम ‘सचिन यादव’ नावाच्या व्यक्तीच्या खात्यात वर्ग झाल्याचे समोर आले आहे. प्रकार लक्षात येताच त्यांनी तत्काळ सायबर हेल्पलाईन आणि ताडदेव पोलिसांकडे तक्रार केली.
या प्रकरणी पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करत, गुगलवर मिळालेल्या कस्टमर केअर क्रमांकांवर अंधविश्वास ठेवू नये तसेच अनोळखी एपीके फाईल्स डाउनलोड करण्याचे टाळावे, असे स्पष्ट केले आहे.
