साईमत / अकोला
अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात एक अत्यंत गंभीर आणि संतापजनक प्रकार उघडकीस आल्याचा आरोप समोर आला आहे. लॉकअपमध्ये असलेल्या महिला आरोपीकडे तिच्या २७ वर्षीय मुलीला पैशांच्या मोबदल्यात “एका रात्रीसाठी” पाठवण्याची मागणी केल्याचा आरोप ड्युटीवरील सहाय्यक पोलिस निरीक्षक (एएसआय) राजेश जाधव यांच्यावर करण्यात आला आहे. या घटनेचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सायबर गुन्ह्याच्या प्रकरणात अटक झालेली महिला मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास लॉकअपमध्ये होती. यावेळी संबंधित अधिकाऱ्याने तिच्या मुलीचे वय विचारले. “२७ वर्षे आहे,” असे उत्तर मिळाल्यानंतर “दहा हजार रुपये देतो, एका रात्रीसाठी पाठव,” असा कथित अश्लील प्रस्ताव दिल्याचा महिलेचा आरोप आहे. “गुन्हा मी केला आहे, माझ्या मुलीने नाही,” असे सांगत तिने तीव्र नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, व्हायरल व्हिडिओमध्ये संबंधित एएसआय आरोप नाकारताना दिसत असून “मी असे काही बोललो का? फालतू काही करू नको,” असे म्हणताना ऐकू येते. तसेच, घटनास्थळी उपस्थित असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यानेही “माझ्यासमोर तसे बोलले नाही,” असे सांगितल्याचे व्हिडिओत दिसते.
याचप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आल्याचेही समोर आले आहे. एका क्लिपमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्याने संबंधित कर्मचाऱ्याला जाब विचारत “वर्दी घालून असे कृत्य करताना लाज वाटली नाही का?” असे सुनावल्याचे दिसते.
या घटनेमुळे अकोला पोलिसांची प्रतिमा डागाळली असून या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित एएसआय राजेश जाधव यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक अर्चीत चांडक यांनी तात्काळ त्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, घटना घडल्यानंतर संबंधित अधिकारी पोलीस ठाण्यातून निघून गेल्याची माहिती असून सध्या पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.
या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
