कौटुंबिक वादाचे विचित्र रूप; जादूटोण्याचा प्रयत्न?
साईमत / अहिल्यानगर
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरात मध्यरात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. एका जावयाने आपल्या सासऱ्याच्या घरासमोर कथित जादूटोणा केल्याचा प्रकार समोर आला असून, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घरातील सर्वजण झोपेत असताना रात्री उशिरा काही संशयास्पद हालचालींचा आवाज आल्याने कुटुंबीय जागे झाले. त्यांनी घराबाहेर येऊन पाहिले असता प्रवेशद्वाराजवळ काही विचित्र वस्तू ठेवण्यात आल्याचे दिसून आले. टाचण्या टोचलेले लिंबू, काळी बाहुली, हळद-कुंकू यांसारखे साहित्य आढळल्याने कुटुंबीयांना धक्का बसला.
याच वेळी घटनास्थळी एक संशयित व्यक्ती आढळून आली. कुटुंबीयांनी तत्काळ त्याला पकडले असता तो स्वतःचा जावई असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, त्याच्यासोबत असलेले इतर साथीदार अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले.
दरम्यान, या प्रकरणामागे जुना कौटुंबिक वाद असल्याची माहिती समोर येत आहे. संबंधित कुटुंबातील मुलीचा काही काळापूर्वी संशयास्पद मृत्यू झाला होता. त्या प्रकरणात पती व त्याच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. सध्या ते जामिनावर सुटले असून, या पार्श्वभूमीवर दोन्ही कुटुंबांमध्ये तणावाचे वातावरण होते.
पीडित कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, जावई केवळ जादूटोणा करण्याच्या उद्देशाने आला नसून धमकावण्याचा किंवा इतर काही हेतू असण्याची शक्यता आहे. तसेच घरातील लहान मुलाला घेऊन जाण्याचा प्रयत्न असावा, असा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे.
घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संशयास्पद साहित्य जप्त केले असून, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
या घटनेमुळे अंधश्रद्धेविरोधातील कायद्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली असून, नागरिकांनी अशा प्रकारांना बळी न पडता तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
