कमी वापर करणाऱ्या ग्राहकांना विशेष लाभ, ०–१०० युनिटसाठी ९.७% आणि ३०१–५०० युनिटसाठी १४% दर कपात
साईमत / मुंबई / प्रतिनिधी
महाराष्ट्रातील घरगुती वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. नवीन आर्थिक वर्ष २०२६–२७ च्या सुरुवातीलाच राज्यभर वीज दरात कपात करण्यात आली आहे. १ एप्रिलपासून हे नवीन दर लागू होतील.
महावितरण, बेस्ट, अदानी आणि टाटा पॉवर यांसारख्या प्रमुख वीज वितरण कंपन्यांनी घरगुती वीज दर कमी करण्याचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे सादर केला होता. आयोगाने प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर राज्यभरात नवीन दर लागू करण्यात येणार आहेत. विशेषतः कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांना याचा अधिक फायदा होणार आहे.
नवीन वीज दर (२०२६–२७ आर्थिक वर्षासाठी):
- ०–१०० युनिट: ४.३ रुपये प्रति युनिट (२०२५–२६ मध्ये ४.७६ रुपये) – ९.७% कपात
- १०१–३०० युनिट: ७.१ रुपये प्रति युनिट (२०२५–२६ मध्ये ७.९६ रुपये) – १०.८% कपात
- ३०१–५०० युनिट: ११.६४ रुपये प्रति युनिट (२०२५–२६ मध्ये १३.५५ रुपये) – १४% कपात
- ५०० पेक्षा अधिक युनिट: १२.६४ रुपये प्रति युनिट (२०२५–२६ मध्ये १४.५५ रुपये) – १३.१% कपात
राज्य सरकार आणि वीज वितरण कंपन्यांनी वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर घेतलेला हा निर्णय नागरिकांना मोठा दिलासा देणार आहे.
