साईमत / पुणे / प्रतिनिधी
पुण्यातील उच्चभ्रू बाणेर परिसरात पोलिसांनी एक मोठे ड्रग रॅकेट उध्वस्त केले आहे. हळदीच्या पाकिटांमध्ये गांजा विकल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी धाड टाकून या रॅकेटचा पर्दाफाश केला.
बाणेर पोलीसांनी आरोपी अभिषेक बोरसे आणि अक्षय बोरसे यांना अटक केली असून, दोघांकडून एकूण 16 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. घटनास्थळावर सुरुवातीला तीन किलो गांजा ताब्यात घेतला गेला. चौकशीदरम्यान आरोपींनी पिंपरी-चिंचवड येथील आपल्या घरात अमली पदार्थ साठवले असल्याचे मान्य केले. यानंतर पोलिसांनी तातडीने छापेमारी करून 13 किलो गांजा जप्त केला.
अटक केलेले दोन्ही आरोपी एका खासगी कंपनीत नोकरी करत असल्याची माहिती समोर आली आहे. तपासात असे दिसून आले की, हळदीच्या पाकिटांचा वापर करून गांजा विकला जात होता. बाणेर पोलीस पुढील तपास करत आहेत.
