साईमत / वृत्तसंस्था / प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. या संभाषणात त्यांनी इराणी जनतेला नवरोज आणि ईद या सणांच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदी यांनी आशा व्यक्त केली की, या सणांच्या काळात पश्चिम आशियात शांतता, स्थैर्य आणि समृद्धी नांदो.
संभाषणादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी आखाती प्रदेशातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवरील अलीकडील हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “मी या प्रदेशातील पायाभूत सुविधांवर केलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. यामुळे प्रादेशिक स्थिरतेला धोका निर्माण होईल आणि जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम होईल.”
याचवेळी पंतप्रधानांनी जागतिक व्यापारासाठी महत्वाच्या सागरी मार्गांचे संरक्षण करण्यावर भर दिला. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तेल वाहतूक अडथळ्यामुळे जागतिक व्यापारावर परिणाम होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. “नौका वहन स्वातंत्र्याचे रक्षण करणे आणि सागरी मार्ग खुले आणि सुरक्षित असले पाहिजेत,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
तसेच, युद्धकाळात इराणमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी इराणने दिलेल्या पाठिंब्याचे पंतप्रधान मोदी यांनी कौतुक केले.
ही दुसरी वेळ आहे की, पश्चिम आशियातील संघर्ष सुरू झाल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि पेझेश्कियान यांच्यात थेट संवाद झाला आहे. २८ फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायलच्या युद्धानंतर मार्च महिन्याच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदी यांनी पहिलेही दूरध्वनीवरून पेझेश्कियान यांच्याशी चर्चा केली होती, त्यावेळी वाढत्या तणावाबाबत चिंता व्यक्त केली होती.
