साईमत नाशिक प्रतिनिधी
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या हक्काच्या घरांवर डल्ला मारणाऱ्या म्हाडा भूखंड घोटाळ्याचे धागेदोरे आता उलगडू लागले आहेत. या प्रकरणातील मुख्य संशयित आणि ‘हॅप्पी होम’ संचालक सोनू मनवानी याच्या पोलीस कोठडीची मुदत न्यायालयाने २३ मार्चपर्यंत वाढवली, ज्यामुळे नाशिकच्या बांधकाम क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
नियमांनुसार एक एकरपेक्षा जास्त भूखंड तयार करताना २० टक्के जागा अल्प उत्पन्न गटाच्या घरांसाठी देणे बंधनकारक आहे. मात्र मनवानी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी या नियमाचा अनादर करत, म्हाडाच्या हक्काच्या जागेचे लहान तुकडे पाडून परस्पर विक्री केली. शासन आणि गोरगरिबांच्या कोट्यवधींचा फसवणूक करण्याचा आरोप पोलिसांनी या प्रकरणात नोंदवला असून, तपासाला राजकीय वलय प्राप्त झाल्याचे समोर आले आहे.
सरकारी वकिलांनी न्यायालयासमोर सांगितले की, घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून सोनू मनवानीची कोठडी वाढवली आहे. यामुळे पोलिसांना या घोटाळ्यातील मोठे मासे पकडण्यासाठी रान मोकळे झाले आहे. आता न्यायालय ४५ संशयितांच्या जामिन अर्जांवर निर्णय घेणार आहे, तसेच म्हाडाच्या जागेवर डल्ला मारणारे पुढचे ‘बिल्डर’ कोण असतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मनवानीच्या अटकेनंतर नाशिकमधील बिल्डर लॉबीमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणात तब्बल १९७ संशयितांची नावे समोर आली असून, त्यात ८४ मोठे विकासक पोलिसांच्या रडारवर आहेत. मागील तीन दिवसांत ४५ हून अधिक विकासक आणि जागामालकांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली, तर काही संशयित ‘नॉट रिचेबल’ असून शहराबाहेर पलायन केले असल्याची माहिती आहे.
या प्रकरणामुळे नाशिकमध्ये म्हाडा जागा आणि अल्प उत्पन्न गटासाठी घरांची सुरक्षितता यावर प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवून संपूर्ण साखळी उघड करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत, आणि भविष्यात या घोटाळ्यातील अनेक मोठ्या नावांचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
