साईमत नाशिक प्रतिनिधी
सोमेश्वर – सातपूर लिंक रोडवर कचऱ्याचे ढीग साठत असल्याची माहिती मिळताच उपमहापौर विलास शिंदे यांनी तातडीने दखल घेतली. स्वच्छता अधिकारी व कर्मचाऱ्यांना बोलवून ताबडतोब परिसर स्वच्छ करून घेतला गेला. संबंधित अधिकाऱ्यांना सातत्याने कचरा उचलण्याचे निर्देश देण्यात आले, तसेच नागरिकांनी रस्त्यावर कचरा न फेकता वर्गीकरण करून घंटागाडीत देण्याचे आवाहन करण्यात आले.
प्रभाग सीमेवर येणारा परिसर
सोमेश्वर – सातपूर लिंक रोड हा भाग प्रभाग ८ आणि प्रभाग ९ यांच्या सीमारेषेवर येतो. प्रभाग ८ मधून विलास शिंदे, कविता लोखंडे, उषा बेंडकुळी, अंकिता शिंदे तर प्रभाग ९ मधून दिनकर पाटील, अमोल पाटील, भारती धिवरे, संगीता घोटेकर हे नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र नागरिकांनी तक्रार केली होती की, काही नगरसेवक निवडून आल्यावर प्रभागात फिरकत नाहीत.
तातडीची कारवाई
उपमहापौर विलास शिंदे यांनी भरदुपारी थेट त्या भागाला भेट देऊन स्वच्छता अधिकारी व कर्मचाऱ्यांना ताबडतोब परिसर स्वच्छ करण्याचे आदेश दिले. स्वतः थांबून कार्यवाही होईल याची दक्षता घेतली.
दोन प्रभागांच्या सीमेवर असलेला हा परिसर लक्षात घेऊन अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्याचे आणि कार्यक्षम कर्मचारी नेमण्याचे निर्देशही देण्यात आले. जेथे कचरा टाकला जातो, तेथे फलक व CCTV लावण्याचे तसेच नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.
नागरिकांचा प्रतिसाद
परिसर स्वच्छ, सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले. यावेळी वरिष्ठ माध्यम प्रतिनिधी व स्वच्छता अधिकारी चिंतामण पवार उपस्थित होते. नागरिकांनी कारवाईबाबत समाधान व्यक्त केले.
