मुलांना वाचवण्यासाठी प्राणदान करणाऱ्या धाडसी तरुणांचा आदर
साईमत/ भडगाव / प्रतिनिधी
भडगाव शहरालगतच्या गिरणा नदीपात्रात रविवारी घडलेली दुर्दैवी घटना शहरासह परिसरात शोककळा पसरवणारी ठरली. मुलांना वाचवण्यासाठी धाडसाने नदीत उतरलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नदीम खान नसीम खान (वय २७) व काफिया शरीफ पिंजारी (वय १६) हे दोघे गिरणा नदीत अडकलेल्या लहान मुलांना तातडीने वाचवण्यासाठी नदीत उतरे. मात्र नदीत खोल खड्ड्यांमुळे त्यांचा तोल गमावला आणि दोघेही पाण्यात बुडले. स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली, पण तेव्हा पर्यंत दोघांचा मृत्यू झालेला होता.
परिसरातील नागरिकांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त करत, दोघांच्या धाडसाचे कौतुक केले. नागरिकांच्या मते, नदीपात्रात रात्रीच्या वेळी जेसीबीच्या साहाय्याने सुरू असलेल्या अवैध वाळू उपशामुळे खोल खड्डे तयार झाले होते. याच खड्ड्यांमुळे ही दुर्दैवी घटना घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. नागरिकांनी प्रशासनाकडून अवैध वाळू उपशावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस व महसूल प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. महसूल विभागाचे अविनाश जंजाडे व प्रशांत कुंभारे, पोलिस निरीक्षक महेश शर्मा, तसेच राजू अहिरे व इकबाल शेख यांनी घटनास्थळी पाहणी केली.
नगरसेवक इमरान अली सय्यद यांनी पोलीस, महसूल प्रशासन व नगरपालिकेला मदतकार्य वेगाने राबवण्याचे निर्देश दिले. नगरसेवक आसिमभाऊ अलीम शाह व डॉ. विजयकुमार देशमुख यांनीही घटनास्थळी उपस्थित राहून मृतांच्या कुटुंबीयांना धीर दिला.
नगरपरिषद मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी पाचोरा येथून नदीत शोधमोहीम राबवण्यासाठी कर्मचारी पाठवले. आरोग्य विभागाचे छोटे वैद्य अजय कंडारे आणि पाचोरा येथील गोताखोर हुसेन दादा यांनी शोध व मदतकार्यात मोलाची भूमिका बजावली.
दरम्यान, आमदार किशोर आप्पा पाटील यांनी भडगाव ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन मृतांच्या कुटुंबीयांना सांत्वन केले. या हृदयद्रावक घटनेमुळे भडगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मुलांचे प्राण वाचवताना स्वतःचे प्राण गमावणाऱ्या दोघांच्या धाडसाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
या घटनेमुळे नागरिकांना नदीतील सुरक्षिततेविषयी जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे, तसेच प्रशासनाकडून या प्रकाराच्या पुनरावृत्ती टाळण्यासाठी कडक उपाययोजना अपेक्षित आहेत.
