किरकोळ कारणावरून तुंबळ हाणामारी तिघांविरोधात गुन्हा दाखल
साईमत/चोपडा/प्रतिनिधी
घरासमोर वाहन उभे करण्याच्या किरकोळ कारणावरून तुंबळ हाणामारीची घटना गुरूवारी १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास चोपडा शहरातील रामपुरा पारधी वाडा परिसरात घडली. या घटनेत एका व्यक्तीला गंभीर दुखापत झाली असून, पोलिसांनी दुपारी २ वाजता तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ४९ वर्षीय नामदेव भिका पारधी (रा. रामपुरा पारधीवाडा) हे व्यावसायिक ड्रायव्हर आहेत. त्यांचे घरासमोर जगदीश राजेंद्र पारधी यांनी आपली गाडी उभी केली होती. नामदेव पारधी यांनी गाडी बाजूला करण्याची विनंती केली, मात्र आरोपींनी राग धरत वाद वाढवला.
वाद लवकरच हाणामारीत रूपांतरित झाला. संशयित आरोपी जगदीश राजेंद्र पारधी, राजेंद्र गबा पारधी आणि निखिल राजेंद्र पारधी यांनी नामदेव पारधी यांच्यावर संगनमताने हल्ला केला. या हल्ल्यात जगदीश पारधी याने लोखंडी रॉडने नामदेवच्या डोळ्यावर आणि कपाळावर वार करत गंभीर दुखापत केली. यावेळी त्याने “आज वाचलास, पण यापुढे नादी लागलास तर तलवारीने कापून टाकू” अशी जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी करत आहेत.
घटना किरकोळ कारणावरून घडली असली तरी, हिंसक वर्तन आणि जीवे मारण्याच्या धमकीमुळे परिसरात सध्या नागरिकांमध्ये मोठा चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी तातडीने तक्रारी नोंदवून कारवाई केली असून, नागरिकांना अशा प्रकारच्या वादातून दूर राहण्याची सूचना दिली आहे.
