तक्रारींनंतर पोलिस दलात खळबळ
साईमत/चोपडा/प्रतिनिधी –वाहनधारकांकडून पैसे उकळल्याच्या तक्रारीनंतर चोपडा शहरातील वाहतूक हवालदार लक्ष्मण त्र्यंबक शिंगाणे यांना निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
चोपडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील पोलिस चौकीत कार्यरत असलेल्या हवालदार शिंगाणे याच्यावर मागील आठवड्यात शिरपूर तालुक्यातील नागेश्वर बगला गावातील एका तरुणाकडून तक्रार करण्यात आली होती. तक्रारीनुसार, गांजासंबंधी कारवाईसाठी तीन ते चार पोलिसांनी या तरुणाकडून पैसे उकळल्याचे बोलले जात होते.
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी या गंभीर तक्रारीची दखल घेऊन त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले. यानुसार, चोपडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक मधुकर साळवे यांनी हवालदार शिंगाणे यांना निलंबित केले असल्याची माहिती दिली.
पोलिसांमधील याप्रकरणी जागरूकता आणि नियमांचे पालन यावर अधिक भर दिला जात असल्याची माहिती देखील पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. स्थानिक नागरिकांनीही पोलीस प्रशासनाच्या तत्पर कारवाईची दखल घेतली आहे.
