शहरात हेल्मेट वापरासंबंधी जनजागृतीसाठी भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन केले
साईमत/जळगाव /प्रतिनिधी –
जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वाहतूक शाखेने वाहतूक सुरक्षा सप्ताह 2026 च्या निमित्ताने शहरात हेल्मेट वापरासंबंधी जनजागृतीसाठी भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन केले. दुचाकी अपघातांमुळे होणाऱ्या जीवितहानीस प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांमध्ये सुरक्षिततेची जाणीव निर्माण करण्यासाठी ही रॅली राबवण्यात आली होती.
रॅलीचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पोलीस मुख्यालय, जळगाव येथून हिरवी झेंडी दाखवून केले. उद्घाटन प्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक पवन देसले, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी आणि शनिपेठ पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांसह महिला-पुरुष पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रॅली पोलीस मुख्यालयातून सुरू होऊन स्वातंत्र्य चौक, काव्यरत्नावली चौक, गाडगेबाबा चौक यांसह शहरातील प्रमुख चौकांमधून मार्गक्रमण करत पुन्हा पोलीस मुख्यालयात संपन्न झाली. रॅलीदरम्यान सहभागी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हेल्मेट घालून “हेल्मेट घाला, जीव वाचवा”, “वाहतूक नियम पाळा” अशा संदेशांचे फलक हातात घेऊन नागरिकांपर्यंत वाहतूक सुरक्षेचा प्रभावी संदेश पोहोचवला.
उपस्थित अधिकाऱ्यांनी नागरिकांना सांगितले की, दुचाकी अपघातांमध्ये डोक्याला होणाऱ्या गंभीर दुखापतीमुळे अनेक जणांचा मृत्यू होतो. हेल्मेटचा नियमित वापर केल्यास अशा अपघातांमध्ये मृत्यूचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते. त्यांनी प्रत्येक दुचाकीस्वाराला स्वतःच्या तसेच कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट वापरण्याचे आवाहन केले. तसेच, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन केल्यास अपघात टाळता येतात आणि सुरक्षित प्रवास शक्य होतो, असेही ते म्हणाले.हेल्मेट रॅलीमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढण्यास मदत होईल, असा विश्वास पोलीस दलाचे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
