‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’, ‘भारत मातेचा विजय असो’, ‘हिंदू एकजुटीचा विजय असो’, ‘हिंदूंनो जागे व्हा’ आणि ‘वंदे मातरम्’ अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
साईमत/जळगाव /प्रतिनिधी –
हिंदूंवर होणारे अन्याय व अत्याचार समाजासमोर मांडणे, धर्मशिक्षणाच्या माध्यमातून हिंदूंना संघटित करणे आणि ‘हिंदू राष्ट्र स्थापने’ची पायाभरणी करण्याच्या उद्देशाने जळगाव शहरात भव्य वाहनफेरीचे आयोजन करण्यात आले. हिंदू जनजागृती समिती व समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने आयोजित हिंदू राष्ट्र-जागृती सभेच्या प्रसारासाठी काढण्यात आलेल्या या वाहनफेरीला शेकडो हिंदुत्वनिष्ठ व धर्मप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
भगवे ध्वज, भगवे फेटे व टोप्या परिधान केलेल्या कार्यकर्त्यांनी शहरातील प्रमुख मार्गांवरून वाहनफेरी काढत संपूर्ण जळगाव शहर भगवेमय केले. ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’, ‘भारत मातेचा विजय असो’, ‘हिंदू एकजुटीचा विजय असो’, ‘हिंदूंनो जागे व्हा’ आणि ‘वंदे मातरम्’ अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. फेरीदरम्यान शौर्य, उत्साह आणि चैतन्याची लाट शहरात पसरल्याचे दृश्य पाहावयास मिळाले.
या वाहनफेरीसाठी सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाड्ये यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच भाजप, शिवसेना, शिवसेना शिंदे गट, शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान यांसह विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रारंभी बिग बाजार, नेहरू चौक येथे जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने व सनातन संस्थेचे धर्मप्रसारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या हस्ते धर्मध्वजाचे पूजन करून वाहनफेरीची सुरुवात करण्यात आली.
यानंतर वाहनफेरी टॉवर चौक, चित्रा चौक मार्गे पुढे सरकली. श्री इच्छापूर्ती गणेश मंदिराजवळ श्याम कोगटा यांच्या हस्ते ध्वज पूजन करण्यात आले. कोर्ट चौक येथे अधिवक्ता मंडळाच्या वतीने वाहनफेरीचे स्वागत करण्यात आले. गणेश कॉलनीत नगरसेवक सौ. दीपमाला काळे व चंद्रशेखर अत्तरदे यांनी स्वागत केले, तर सुकृती पॅनलजवळ नगरसेवक मनोज चौधरी यांनी सहभाग नोंदविला. पिंप्राळा चौकात माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या वतीने सरबत वितरणाचे नियोजन करण्यात आले होते. ठिकठिकाणी पुष्पवृष्टी, आकर्षक रांगोळ्या आणि स्वागतफलकांमुळे वाहनफेरीला उत्सवी स्वरूप प्राप्त झाले.
पिंप्राळा येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ या भव्य वाहनफेरीचा समारोप करण्यात आला. यावेळी हिंदू जनजागृती समितीच्या कु. रागेश्री देशपांडे यांनी १ फेब्रुवारी रोजी मानराज पार्क येथे आयोजित हिंदू राष्ट्र-जागृती सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले.
या वाहनफेरीत नवनिर्वाचित नगरसेवक मनोज चौधरी, राहुल पाटील, कविता पाटील, कुलभूषण पाटील, श्याम कोगटा, कैलास अप्पा सोनवणे, प्रतीक्षा सोनवणे, कल्पेश सोनवणे, मुकुंदा सोनवणे, दीपमाला काळे, माजी महापौर सीमा भोळे, उज्वला बेंडाळे, अतुल बारी यांच्यासह अनेक नगरसेवक व मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे वाहनफेरीला अधिक बळ मिळाले असून हिंदू राष्ट्र-जागृतीचा संदेश प्रभावीपणे जनमानसात पोहोचल्याचे चित्र दिसून आले.
