१६७ शाळांमध्ये खेळासाठी नवसुविधा उभारल्या जाणार
साईमत/ जळगाव /प्रतिनिधी
जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकास सुनिश्चित करण्यासाठी ‘पालकमंत्री क्रीडांगण विकास योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १६७ शाळांसाठी १२ कोटी १४ लाख ४० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
ग्रामीण भागातील शाळांमध्ये क्रीडासुविधांचा अभाव विद्यार्थ्यांचा खेळाकडे ओढा कमी करीत होता, ज्याचा थेट परिणाम त्यांच्या शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक उत्साह आणि स्पर्धात्मक वृत्तीवर होत होता. आता या योजनेमुळे विद्यार्थ्यांना नियमित खेळाची संधी उपलब्ध होणार असून शाळांमधील उपस्थिती आणि पटसंख्याही वाढण्यास मदत होणार आहे.
योजनेअंतर्गत ९९ शाळांना प्रत्येकी १० लाख रुपये आणि ६७ शाळांना प्रत्येकी ३ लाख २० हजार रुपये निधी वितरित केला जाईल. निधीच्या तरतुदीमध्ये शाळेतील उपलब्ध जागा, विद्यार्थी संख्येचा अंदाज आणि आवश्यक कामांचा विचार केला गेला आहे. मंजूर शाळांमध्ये कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉलसह २०० मीटर रनिंग ट्रॅक आणि इतर आवश्यक क्रीडासुविधा उभारल्या जातील.
तालुकानिहाय शाळांची संख्या पुढीलप्रमाणे आहे – अमळनेर १३, भडगाव ७, पाचोरा १४, भुसावळ ७, पारोळा १०, मुक्ताईनगर १०, रावेर १३, बोदवड ४, यावल १०, चाळीसगाव १७, एरंडोल ८, चोपडा १०, धरणगाव ११, जामनेर २१ आणि जळगाव ११.
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “शाळांमध्ये शिक्षणासोबत विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकास तितकाच महत्त्वाचा आहे. क्रीडांगणामुळे विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण होईल, उपस्थिती वाढेल आणि शाळांतील पटसंख्येलाही चालना मिळेल. प्रत्येक तालुक्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार क्रीडा सुविधा मिळाव्यात, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.”
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी योजनेचे स्वागत करताना सांगितले की, पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा विकासासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी योजनेअंतर्गत कामांचे तांत्रिक मंजुरी आणि कार्यारंभ आदेशाची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुरक्षित, दर्जेदार क्रीडांगण उपलब्ध होण्यामुळे भविष्यातील खेळाडूंच्या विकासाला या योजनेमुळे निश्चितच गती मिळणार आहे.
