जळगाव ‘हार्ट प्लस’ हॉस्पिटलमध्ये नर्सवर वैद्यकीय अधिकार्यांची छळकांडी; गंभीर धमक्या!
साईमत/ जळगाव /प्रतिनिधी
जळगाव शहरातील ‘हार्ट प्लस’ हॉस्पिटलमध्ये कार्यरत एका ३० वर्षीय परिचारिकेवर डॉक्टरांच्या अश्लील चाळ्यांमुळे आणि गंभीर धमक्यांमुळे खळबळ उडाली आहे. जिल्हापेठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी डॉ. संदीप भारुडे आणि डॉ. प्रीती भारुडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित नर्स २१ जुलै २०२५ पासून २० जानेवारी २०२६ या कालावधीत डॉ. संदीप भारुडे याच्या सततच्या छेडछाडीस सामोरे गेली. त्याने हॉस्पिटलमध्ये जबरदस्तीने अश्लील चाळे करत तिला पाठलाग केले. पीडितेने विरोध दर्शविला असता, डॉ. प्रीती भारुडे यांनी तिला “जर याबाबत कोणाला सांगितले, तर तुझ्या पतीला आणि मुलांना औषध देऊन मारून टाकू” अशी गंभीर धमकी दिली.
सततच्या त्रासामुळे पीडितेने २१ जानेवारी रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपास सुरू केला असून, महिला पोहेकॉ भारती देशमुख या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात मोठा धक्का दिला असून, हॉस्पिटलमध्ये काम करत असलेल्या महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाला आहेत. संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
