सीट बेल्ट व एअरबॅगमुळे चौघांचे प्राण वाचले
साईमत/ जळगाव /प्रतिनिधी
नाशिक येथे भाजप नगरसेवकांच्या गट नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करून जळगावकडे परत येत असताना जळगावच्या माजी महापौर तथा नवनिर्वाचित नगरसेविका जयश्री महाजन आणि त्यांचे पती नगरसेवक सुनील महाजन यांच्या कारचा मालेगावजवळ भीषण अपघात झाला. बुधवारी (दि. २१) सकाळी सुमारे ७.४५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने महाजन दाम्पत्यासह कारमधील चौघेही जण बालंबाल बचावले.
जळगाव महानगरपालिकेतील भाजपचे नवनिर्वाचित ४६ नगरसेवक गट नोंदणीसाठी नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात गेले होते. ही अधिकृत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जयश्री महाजन व सुनील महाजन हे (एम.एच. ५२ बी ०९९९) क्रमांकाच्या कारने जळगावकडे परतत होते. मालेगावजवळील हॉटेल सुखधाम परिसरात महामार्गावर समोरील वाहनाने गतिरोधकामुळे अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे मागून भरधाव वेगात येणारी महाजन दाम्पत्याची कार समोरील वाहनावर जोरात आदळली.
धडकेची तीव्रता इतकी होती की कारच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चुराडा झाला. मात्र अपघाताच्या वेळी कारमध्ये प्रवास करणारे माजी महापौर जयश्री महाजन, नगरसेवक सुनील महाजन, विनोद मराठे आणि स्वीय सहाय्यक ललित धांडे या चौघांनीही सीट बेल्ट लावले होते. याशिवाय एअरबॅग्स वेळेवर उघडल्याने आणि चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली. चौघांनाही गंभीर दुखापत झाली नसून प्राथमिक तपासणीनंतर त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.
या घटनेनंतर परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी मदतीस धाव घेतली. या अपघातामुळे महामार्गावरील वेगमर्यादा, गतिरोधकांजवळील सावधगिरी आणि सीट बेल्टच्या वापराचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
