पारोळा पोलिसांनी दाखल केला गुन्हा
साईमत/ पारोळा /प्रतिनिधी
न्यायालयात खोटी कागदपत्रे सादर करून वारसा हक्क डावलून वडिलांच्या मालकीची शेतजमीन आणि घरफाटा बळकावल्याप्रकरणी पारोळा पोलिस ठाण्यात तक्रारदार ज्योती संजय सोनार (वय ५०, रा. आसोदा, जि. जळगाव) यांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात त्यांच्या दोन सख्ख्या भावांचा तसेच आईचा सहभाग असल्याचे सांगण्यात येते.
तक्रारीनुसार, घटना २ सप्टेंबर २०२१ ते १८ मे २०२४ दरम्यान घडली. ज्योती सोनार यांचे भाऊ सोमनाथ विठ्ठल टोळकर (वय ४५) आणि गोविंद विठ्ठल टोळकर (वय ५२) तसेच आई शोभाबाई विठ्ठल टोळकर (वय ७२, सर्व टोळकर गल्ली, पारोळा) यांनी मिळून संगनमत करून फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
संशयित आरोपींनी पारोळा येथील दिवाणी न्यायालयात खोटा दिवाणी दावा (क्र. ११५/२०२३) दाखल केला. या प्रकरणात त्यांनी बनावट प्रतिज्ञापत्रे आणि बंधपत्रे सादर केली. या कागदपत्रांच्या आधारे वारसा हक्क प्रमाणपत्र मिळवून, ज्योती सोनार यांचा वारसा हक्क डावलण्यात आला.
मौजे शेवगे बुद्रुक (ता. पारोळा) येथील गट क्रमांक ३९६ मधील २ हेक्टर ५९ आर वडिलांच्या नावावरील शेतजमीन आरोपींनी स्वतःच्या नावावर करून घेतली. तसेच वडिलांच्या हयातीत पारोळा येथील टोळकर भवन (मिळकती क्र. २३८७) तक्रारदाराची संमती न घेता आणि हक्क सोड न घेता गोविंद टोळकर यांच्या नावावर फसवणूक करून नोंदवण्यात आला.
या प्रकरणी २० जानेवारी २०२६ रोजी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक विजय भोबें यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे. तपासास सपोनि. चंद्रसेन पालकर मार्गदर्शन करत आहेत.
पोलिसांनी नागरिकांना सूचना केली आहे की कोणत्याही प्रकारच्या मालमत्ता हस्तांतरणात कायमची खात्री आणि न्यायालयीन प्रमाणपत्रांची पडताळणी करावी.
