कोल्हे हिल्स परिसरात घराला आग, ४० हजारांचे नुकसान
साईमत/ जळगाव /प्रतिनिधी
जळगाव शहरालगत असलेल्या कोल्हे हिल्स परिसरातील देवराम नगर येथे बुधवारी मध्यरात्री एका घराला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत घरातील संसारोपयोगी व जीवनावश्यक साहित्य मोठ्या प्रमाणावर जळून खाक झाले असून सुमारे ३५ ते ४० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने वेळीच दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी जीवितहानी टळली.
देवराम नगर परिसरात राहणारे जितेंद्र गणपत लोखंडे यांच्या घराला रात्री सुमारे १२.४५ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. मध्यरात्रीची वेळ असल्याने घरातील सदस्यांना आग लागल्याचे उशिरा लक्षात आले. दरम्यान, तालुका पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल मिलिंद सपकाळे यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला कळवले.
माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पाण्याचा मारा करत जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या धाडसी कारवाईत वाहन चालक देविदास सुरवाडे तसेच अग्निशमन जवान रोहिदास चौधरी, योगेश पाटील, ऋषभ सुरवाडे, विठ्ठल पाटील आणि शुभम सोनवणे यांनी सहभाग घेतला.
आगीमुळे लोखंडे यांच्या घरातील कपडे, भांडी, फर्निचर व इतर संसारोपयोगी साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले. सुदैवाने अग्निशमन दलाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने ती शेजारील घरांपर्यंत पसरली नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला.दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संबंधित यंत्रणांकडून घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.
