साईमत मुंबई प्रतिनिधी
भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज रिंकू सिंह सध्या एक मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. २१ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेपूर्वीच त्याच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी उत्तर प्रदेशातील अलिगड येथील सासनी गेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली आहे.
माहितीनुसार, रिंकूने नुकतीच सोशल मीडियावर एक रील शेअर केली होती. या व्हिडिओमध्ये त्याने क्रिकेटमधील यशाचे श्रेय देवाला दिले, परंतु व्हिडिओमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) सहाय्याने भगवान हनुमान, भगवान विष्णू, भगवान शिव आणि श्री गणेश यांना एका कारमध्ये चष्मा घालून बसलेले दाखवण्यात आले आहे. त्याच व्हिडिओमध्ये रिंकू मैदानात षटकार मारताना दिसत आहे. देवतांचे अशा प्रकारे चित्रण झाल्यामुळे सोशल मीडियावर वाद सुरु झाला आहे.
या रीलवर चाहत्यांमध्ये विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही चाहत्यांनी रिंकूला पाठिंबा दिला असला तरी, करणी सेनाने यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. संघटनेने दावा केला आहे की, देवतांचे हे रूप अपमानजनक आहे आणि रिंकू सिंहने जाहीर माफी मागावी, तसेच त्याच्यावर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे.
बऱ्याच काळानंतर भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या रिंकूसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. २१ जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका सुरू होत आहे. या मालिकेसाठी सज्ज होत असतानाच कायदेशीर कचाट्यात अडकल्याने त्याच्या कामगिरीवर परिणाम होईल का? याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
विशेषत: संघातील प्रशिक्षक, सहकारी खेळाडू आणि चाहत्यांच्या भावना या घटनेमुळे प्रभावित होऊ शकतात, आणि रिंकूच्या भावनिक स्थैर्यावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
