४८० युवक-युवतींनी रंगमंचावर प्रत्यक्ष परिचय
साईमत /जळगाव/प्रतिनिधी : –
महाराष्ट्र सुवर्णकार सेना जळगाव जिल्हा तर्फे आयोजित अखिल भारतीय सुवर्णकार समाजाचा १० वा ‘ऋणानुबंध’ वधू-वर-पालक परिचय मेळावा नुकताच आदित्य लॉन येथील विजय बुधाशेठ बिरारी सभागृहात उत्साहात पार पडला. या महत्त्वाच्या सामाजिक कार्यक्रमात सुमारे ४८० युवक-युवतींनी प्रत्यक्ष रंगमंचावरून आपला परिचय दिला, तर ६० ते ७० विवाह जुळण्याच्या मार्गावर असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
मेळाव्यासाठी महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातून समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकूण १५०० जणांची नोंदणी झाली होती, यात ४०० वधू आणि ११०० वरांचा समावेश होता. विशेष म्हणजे, वधू-वर आणि पालकांसाठी प्रत्यक्ष संवाद व परिचयासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले होते, ज्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन श्री संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजूमामा भोळे, उद्योजक सुनील मंत्री, माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर, नवनिर्वाचित नगरसेविका रंजनाताई वानखेडे, गौरव बिरारी, यश विसपुते, नितीन सोनार, पौर्णिमा देवरे, रमेश वाघ, शरदचंद्र रणधीर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात ‘ऋणानुबंध’ वधू-वर परिचय पुस्तिकेचेही प्रकाशन करण्यात आले.
जिल्हाध्यक्ष संजय विसपुते यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले, “आजच्या काळात मेळावे ही काळाची गरज आहे. विवाह म्हणजे केवळ दोन मनांचे मिलन नसून तो संस्कार आहे. पालकांनी व मुला-मुलींनी अवास्तव अपेक्षा न बाळगता लग्न ठरवावे, तसेच सुवर्ण कारागिरांनीही सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा.”
मेळाव्यासाठी कुठलेही प्रवेश शुल्क आकारण्यात आले नव्हते. परिचय देणाऱ्या मुलींना परिचय पुस्तिका व चटई भेट म्हणून देण्यात आली. वाजवी दरात पुस्तिका उपलब्ध करून देण्यात आली.
मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी जिल्हा उपाध्यक्ष विजय वानखेडे, जिल्हा सचिव संजय पगार, स्वागताध्यक्ष रमेश वाघ, मेळावा प्रमुख सुभाष सोनार, उपप्रमुख नितीन गंगापुरकर, नियोजन समिती प्रमुख शरदचंद्र रणधीर, सचिव प्रशांत विसपुते, सहसचिव दिलीप पिंगळे, प्रसिद्धी प्रमुख गोकुळ सोनार व महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली.
