माहेरहून पैशांचा तगादा ठरला छळाचे कारण
साईमत /पाचोरा/प्रतिनिधी :
माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा सातत्याने मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या सहा जणांविरोधात फर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून हुंडाबळीच्या घटनांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
याप्रकरणी योगिता प्रमोद पाटील (वय २७, व्यवसाय – गृहिणी, रा. स्वामी समर्थ कॉलनी, रांजनगाव, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, त्यांचा विवाह १ मे २०१४ रोजी सावळदबारा येथे हिंदू रितीरिवाजानुसार प्रमोद भरतसिंग पाटील यांच्याशी झाला होता. विवाहावेळी माहेरकडून संसारोपयोगी साहित्य, फर्निचर, भांडी, ५ ग्रॅम सोन्याची अंगठी, २ तोळे सोन्याची चैन तसेच हुंड्यापोटी २ लाख रुपये रोख देण्यात आले होते.
लग्नानंतर सुरुवातीचा सुमारे एक वर्षाचा कालावधी समाधानकारक गेला. मात्र त्यानंतर पती, सासू-सासरे, जेठ, नणंद व नणंदेई यांनी संगनमत करून माहेरहून अधिक पैसे आणण्याचा तगादा लावण्यास सुरुवात केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. “तू उलट्या पायाची आहेस, तुझ्यामुळे घरात पैसा टिकत नाही,” अशा शब्दांत अपमान करत वारंवार मानसिक छळ केला जात होता. यासोबतच जीवे मारण्याच्या धमक्या देणे तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
तक्रारदार महिलेने दिलेल्या माहितीनुसार, पती दारूच्या नशेत शिवीगाळ करून मारहाण करीत असे. चारित्र्यावर संशय घेऊन सातत्याने मानसिक त्रास दिला जात होता. घराच्या वरच्या मजल्याच्या बांधकामासाठी तक्रारदाराच्या वडिलांनी दोन लाख रुपये दिले असतानाही छळ थांबवण्यात आला नाही, असेही तिने आपल्या जबाबात स्पष्ट केले आहे.
या प्रकरणी पती प्रमोद भरतसिंग पाटील, सासरे भरतसिंग हिलाल पाटील, सासू सिंधुताई भरतसिंग पाटील, जेठ गणेश भरतसिंग पाटील (सर्व रा. स्वामी समर्थ कॉलनी, रांजनगाव, ता. गंगापूर) तसेच नणंदेई समाधान पवार व नणंद पुष्पाताई समाधान पवार (रा. दहिगाव पिंपरी, ता. ऐरंडोल) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम ८५, ११५(२), ३५२, ३५१(२) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याची नोंद फर्दापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल निलेश लोखंडे व इतर पोलीस कर्मचारी करीत आहेत. महिलांवरील कौटुंबिक अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाईची गरज असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.
