भाजपचा ठाम दावा, शिंदे गट उपमहापौरपदाच्या तयारीत
साईमत /जळगाव/प्रतिनिधी :
जळगावसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणूक निकालांनी शुक्रवारी राजकीय चित्र स्पष्ट केले. जळगाव महानगरपालिकेत महायुतीने ७५ पैकी तब्बल ६९ जागा जिंकत एकतर्फी सत्ता मिळवली असून, या निकालानंतर शहराच्या राजकारणाचे लक्ष थेट महापौरपदाकडे केंद्रित झाले आहे. विशेष म्हणजे भाजपने सर्वच्या सर्व ४६ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरण्याचा मान पटकावला आहे. त्याखालोखाल शिवसेना (शिंदे गट) २२ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.
भक्कम बहुमतामुळे महायुतीकडून पुढील महापौर कोण होणार, यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मात्र अद्याप महापौरपदाचे आरक्षण जाहीर झालेले नसल्याने अधिकृत चित्र स्पष्ट झालेले नाही. आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतरच महापौरपदाचा अंतिम चेहरा समोर येणार असला, तरी त्याआधीच महायुतीमध्ये हालचालींना वेग आला असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
महापालिकेत सर्वाधिक संख्याबळ असलेल्या भाजपने महापौरपदावर ठाम दावा केला आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून, अनुभवी, स्वच्छ प्रतिमा असलेला आणि संघटनात्मक पार्श्वभूमी मजबूत असलेला नगरसेवक महापौरपदासाठी निश्चित करण्यावर भर दिला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भाजपकडे इच्छुकांची संख्या मोठी असल्याने योग्य तो समतोल साधण्याचे आव्हान पक्षनेतृत्वासमोर आहे.
दुसरीकडे, महायुतीतील दुसरा मोठा घटक पक्ष असलेल्या शिंदे गटाला उपमहापौरपद देण्यावर जवळपास एकमत झाले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिंदे गटानेही उपमहापौरपदासाठी इच्छुकांची चाचपणी सुरू केली आहे. तर अजित पवार गटाला एकच जागा मिळाल्याने त्यांच्या एकमेव नगरसेवकाला स्थायी समिती किंवा विषय समितीवर संधी देण्याचा विचार महायुतीकडून केला जात असल्याचे समजते.
महापौरपद भाजपकडे आणि उपमहापौरपद शिंदे गटाकडे जाणार, हे जवळपास निश्चित मानले जात असले, तरी दोन्ही पदांसाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे नेतृत्व निवडताना मोठी कसरत करावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर, इच्छुकांचा विचार करता महापौर व उपमहापौर पदासाठी टप्याटप्याने एकापेक्षा अधिक नगरसेवकांना संधी देण्याचा पर्यायही चर्चेत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
दरम्यान, नगरविकास खात्याकडून पुढील आठवड्यात महापौरपदासाठी आरक्षण सोडत जाहीर होण्याची शक्यता असून, जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महापौर निवडीची प्रक्रिया पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत जळगावच्या राजकारणात मोठी घोषणा होण्याची दाट शक्यता असून, महापौरपदाची ‘सत्तासूत्रे’ नेमकी कोणाच्या हाती जाणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
