जळगावात शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांच्या वाहनावर अज्ञातांची दगडफेक; राजकीय वातावरण तापले
साईमत /जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापल्याचे चित्र समोर आले असून शिवसेना शिंदे गटाचे जळगाव जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्या चारचाकी वाहनावर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक करून मोठी तोडफोड केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विष्णू भंगाळे यांचे चारचाकी वाहन त्यांच्या निवासस्थानाबाहेर नेहमीप्रमाणे पार्किंगला लावण्यात आले होते. रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी या वाहनावर दगडफेक केली. या दगडफेकीत वाहनाच्या काचा फुटल्या असून बॉडीचेही नुकसान झाले आहे. सकाळी ही बाब निदर्शनास येताच परिसरात चर्चेला उधाण आले.
या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, हा प्रकार अचानक नसून पूर्वनियोजित असण्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सध्या जळगाव जिल्ह्यातील राजकीय घडामोडी लक्षात घेता, राजकीय वैरातूनच हा हल्ला झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, या घटनेवर प्रतिक्रिया देताना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. हा हल्ला भ्याडपणाचा असून यामागे जे कोणी असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना वेळीच धडा शिकवावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून पुढील तपास सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासणे तसेच संशयितांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. या प्रकारामुळे जळगावातील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता असून प्रशासनाची पुढील भूमिका काय राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
