मिस्त्री कामाच्या थकीत वाद, हनुमान मंदिराजवळ गोळीबार
साईमत /जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील पिंप्राळा परिसरात गुरुवारी ऐन निवडणुकीच्या दिवशी वैयक्तिक वादातून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. आनंद मंगल सोसायटीजवळील हनुमान मंदिराजवळील या घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही, मात्र नागरिकांमध्ये काही वेळेस भीतीचे वातावरण पसरले होते.
सदर घटनेत संशयित आरोपी तुषार सोनवणे आणि फिर्यादी मुस्तफा यांच्यात मिस्त्री कामाच्या थकीत पैशांच्या वादातून भांडण सुरू झाले. तुषार सोनवणे याच्याकडे अंदाजे १ लाख ७० हजार रुपये थकले होते, जे वारंवार मागणी केल्यानंतरही मुस्तफा यांनी देण्यास टाळाटाळ केली. गुरुवारी आनंद मंगल सोसायटीजवळ दोघे समोरासमोर आले, तेव्हा हा वाद उफाळला आणि संतापलेल्या तुषार सोनवणे यांनी एक राऊंड गोळीबार केला.
घटनास्थळी पोलिसांना बंदुकीची रिकामी पुंगळी सापडली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी स्पष्ट केले की, हा प्रकार पूर्णपणे वैयक्तिक वादातून घडला असून, सुरू असलेल्या निवडणुकांशी याचा कोणताही संबंध नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी नितीन गणापुरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि रामानंदनगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
फिर्यादी मुस्तफा यांनी रामानंदनगर पोलीस स्टेशन गाठले असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी संशयित आरोपी तुषार सोनवणे याला ताब्यात घेतले असून पुढील तपास रामानंदनगर पोलिस करत आहेत.
दोन्ही व्यक्ती पिंप्राळा परिसरातील रहिवासी आहेत, आणि ही घटना परिसरात काही वेळेस भीतीचे वातावरण निर्माण करणारी ठरली. पोलीस प्रशासनाने घटनास्थळी तत्काळ हस्तक्षेप करून सुरक्षितता सुनिश्चित केली आहे.
