साईमत वृत्तसेवा
कीव्ह/मॉस्को: गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया–युक्रेन युद्धाने पुन्हा एकदा भीषण वळण घेतले आहे. नववर्षाच्या सुरुवातीलाच रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि तीव्र हवाई हल्ला चढवला असून, रात्रभर शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या माऱ्याने युक्रेनमध्ये प्रचंड हाहाकार उडाला आहे. या हल्ल्यामुळे अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला असून, कडाक्याच्या थंडीत नागरिकांचे हाल वाढले आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध थांबवण्यासाठी रशिया आणि युक्रेनच्या नेतृत्वाशी अनेक बैठका घेतल्या असल्या, तरी अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. उलट, दोन्ही देशांमधील संघर्ष अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र या ताज्या हल्ल्यामुळे स्पष्ट झाले आहे.
293 ड्रोन आणि 18 क्षेपणास्त्रांचा मारा
युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, १२ जानेवारीची रात्र ते १३ जानेवारीची सकाळ या कालावधीत रशियाने युक्रेनच्या विविध भागांना लक्ष्य करत एकूण 293 ड्रोन आणि 18 क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यांत पायाभूत सुविधांना मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, अनेक शहरांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. २०२६ या नव्या वर्षातील हा रशियाचा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला असल्याचे मानले जात आहे.
युक्रेनची प्रभावी प्रत्युत्तर कारवाई
या भीषण हल्ल्यानंतर युक्रेनच्या वायूसेनेने निवेदन जारी करत संरक्षण दलाच्या कारवाईची माहिती दिली. त्यानुसार, 293 ड्रोनपैकी 240 ड्रोन यशस्वीपणे पाडण्यात आले, तर 18 क्षेपणास्त्रांपैकी 7 क्षेपणास्त्रे नष्ट करण्यात आली. वायूसेना, मोबाईल फायटर ग्रुप आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर युनिट्सने समन्वय साधत मोठ्या प्रमाणात हल्ले निष्फळ ठरवले, असे युक्रेनच्या लष्कराने स्पष्ट केले.
जागतिक पातळीवर तणाव वाढण्याची शक्यता
या हल्ल्यामुळे युक्रेनमधील काही भागांचे मोठे नुकसान झाले असले, तरी संरक्षण दलाच्या तत्परतेमुळे जीवितहानी टळल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, रशियाच्या या आक्रमक कारवाईनंतर युक्रेन कशा स्वरूपात प्रत्युत्तर देणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. या ताज्या हल्ल्यामुळे युद्ध थांबवण्याचे सर्व राजनैतिक प्रयत्न अपयशी ठरत असल्याचेही स्पष्ट संकेत मिळत आहेत.
