कष्ट, शिस्त आणि स्वप्नांची ताकद प्रेम पुरकरचा नेपाळमध्ये सुवर्णविजय
साईमत /मुक्ताईनगर/ /प्रतिनिधी :
ग्रामीण भागातील जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांची ताकद पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर ठळकपणे अधोरेखित झाली आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील चारठाणा गावाचा सुपुत्र प्रेम श्रीकृष्ण पुरकर याने नेपाळमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत २०० मीटर धावण्यात सुवर्णपदक पटकावत इतिहास रचला. या दैदीप्यमान यशानंतर चारठाणा गावात प्रेमचे ढोल-ताशांच्या गजरात आणि फुलांच्या वर्षावात भव्य स्वागत करण्यात आले.
नेपाळमधील पोखरा येथील रंगसाला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आयोजित ‘युथ गेम इंडो–नेपाळ इंटरनॅशनल सिरीज २०२६’ या प्रतिष्ठित स्पर्धेत प्रेम पुरकरने २०० मीटर धावण्याचे अंतर अवघ्या २३ सेकंद ८७ पॉइंट्समध्ये पूर्ण करत प्रथम क्रमांक पटकावला. अत्यंत साध्या व हलाखीच्या कौटुंबिक परिस्थितीतून पुढे येत प्रेमने मिळवलेले हे यश केवळ वैयक्तिक विजय नसून संपूर्ण मुक्ताईनगर तालुक्यासाठी अभिमानास्पद ठरले आहे.
सुवर्णपदकासह प्रेम चारठाणा गावात परतताच आनंदाला उधाण आले. गावाच्या प्रवेशद्वारापासूनच फुलांच्या हारांनी, गुलाल उधळून आणि जोरदार घोषणाबाजी करत त्याचे स्वागत करण्यात आले. ग्रामस्थ, महिला, युवक तसेच नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ढोल-ताशांच्या निनादात काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीमुळे संपूर्ण गाव उत्सवमय वातावरणात न्हाऊन निघाले होते.
याच स्पर्धेत मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा परिसरातील खेळाडूंनीही उल्लेखनीय कामगिरी करत शेतकरी कुटुंबातील मुलांची आंतरराष्ट्रीय भरारी अधोरेखित केली. ७ ते ९ जानेवारी २०२६ दरम्यान झालेल्या या स्पर्धेत BOY U-17 गटातील ४×१०० मीटर रिले स्पर्धेत या संघाने अंतिम फेरीत द्वितीय क्रमांक मिळवत सिल्व्हर मेडल आणि ट्रॉफी पटकावली. पोखरा स्टेडियमवर मुक्ताईनगरचा क्रीडाजाज्वल्य आवाज घुमत राहिला.
भारताचे प्रतिनिधित्व करत रौप्य पदक जिंकणाऱ्या संघात संकेत विनोद पाटील (इयत्ता ९ वी), ओम रामेश्वर तायडे (इयत्ता १० वी), प्रेम श्रीकृष्ण पुरकर (इयत्ता ११ वी), हेमंत अर्जुन चोपडे (इयत्ता १० वी) आणि देवेश राजू बोरसे (इयत्ता १० वी) या गुणवंत खेळाडूंचा समावेश होता. विशेष म्हणजे या सर्व खेळाडूंचे आई-वडील शेतकरी किंवा शेतमजूर असून मर्यादित साधनांमध्येही त्यांनी आपल्या मुलांच्या क्रीडा स्वप्नांना खंबीर पाठबळ दिले.
योग्य प्रशिक्षण, संतुलित पोषण, शिस्तबद्ध सराव आणि पालकांचा भक्कम भावनिक आधार यामुळे या खेळाडूंनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवले. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे संपूर्ण मुक्ताईनगर तालुक्याची मान अभिमानाने उंचावली आहे. विविध सामाजिक व क्रीडा संघटनांकडून या युवा खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
