साईमत वृत्तसेवा
देशाच्या संसदीय इतिहासात यंदा एक नवा अध्याय जोडला जाणार आहे. पहिल्यांदाच केंद्रीय अर्थसंकल्प हा रविवारी सादर केला जाणार असून, १ फेब्रुवारी २०२6 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत Budget 2026 मांडणार आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी रविवारी अर्थसंकल्प सादर होणार असल्याची अधिकृत घोषणा करताच राजकीय व आर्थिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
यंदाचा अर्थसंकल्प विशेष महत्त्वाचा मानला जात असून, निर्मला सीतारमण यांचा हा आठवा केंद्रीय अर्थसंकल्प असणार आहे. सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान मिळवणाऱ्या त्या देशातील मोजक्या अर्थमंत्र्यांपैकी एक ठरणार आहेत.
दरम्यान, केंद्रीय संसदीय मंत्री किरण रिजीजू यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २८ जानेवारी ते २ एप्रिल २०२६ या कालावधीत दोन सत्रांत होणार आहे. या संदर्भातील निर्णय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केल्याची माहिती रिजीजू यांनी सोशल मीडियावरून दिली.
अधिवेशनाचे पहिले सत्र २८ जानेवारी रोजी सुरू होऊन १३ फेब्रुवारी रोजी संपणार आहे. त्यानंतर दुसरे सत्र ९ मार्चपासून सुरू होऊन २ एप्रिल रोजी समाप्त होणार आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच टप्प्यात, १ फेब्रुवारी रोजी—जो यंदा रविवार आहे—केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. आजवर कधीही रविवारी अर्थसंकल्प मांडण्यात आलेला नव्हता; त्यामुळे हा निर्णय ऐतिहासिक मानला जात आहे.
परंपरेनुसार, प्रत्येक वर्षीचे पहिले संसदीय अधिवेशन हे अर्थसंकल्पीय अधिवेशन असते. या अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत सरकारच्या धोरणांची दिशा मांडणार आहेत.
अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर जुलै-ऑगस्टमध्ये पावसाळी अधिवेशन, तर नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशन घेतले जाते. मात्र, यंदाचा रविवारी सादर होणारा अर्थसंकल्प हा राजकीय, आर्थिक आणि संसदीय दृष्टिकोनातून विशेष ठरणार असून, Budget 2026 कडून सर्वसामान्य नागरिक, उद्योगजगत आणि गुंतवणूकदारांच्या अपेक्षा मोठ्या आहेत.
