जळगावातील दोन मोठ्या चोरीचे गुन्हे उघडकीस
साईमत /जळगाव /प्रतिनिधी :
शहरातील घरफोडींच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाला स्थानिक पोलीसांनी मोठा फटका दिला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या यशस्वी कारवाईत आंतरराज्यीय अट्टल गुन्हेगार चंदन राजू जुनी याला पुण्यातील हडपसर परिसरातून ताब्यात घेण्यात आले असून, त्याने जळगावातील दोन मोठ्या घरफोडींच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी दोन स्वतंत्र पथकांची स्थापना करून तपास सुरू केला होता. शहरातील विविध भागातील सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण करून संशयित आरोपीची ओळख पटविण्यात पोलीस यशस्वी झाले.
चंदन राजू जुनी (वय ४५, रा. सरदारपाडा वस्ती, उल्हासनगर-१, ता. कल्याण, जि. ठाणे) यांनी चौकशीत कबुल केले की, त्यांनी आपला भाऊ कुलदीप राजू जुनी व आणखी दोन साथीदारांसोबत मिळून हे घरफोडीचे गुन्हे केले आहेत. चोरी केलेल्या वस्तूंपैकी ३८ हजार रुपये कुलदीप जुनी यांनी ऑनलाईन पद्धतीने चंदनच्या बँक खात्यात पाठवले होते.
अटक करण्यात आलेल्या चंदन जुनीला पुढील कारवाईसाठी शनीपेठ पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले करीत आहेत.
ही संपूर्ण कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पाडली. तसेच, तांत्रिक आणि नेत्रम विभागाच्या सहकार्यामुळे गुन्हे उघडकीस येण्यास महत्त्वाची मदत झाली आहे
